Sunday, April 26, 2009

माझी आजी ...

ह्या विषयावर लहानपणी बहूतेक सगळ्यांनी एकदा तरी निबंध लिहिला असेल.

आजी म्हटले की मला आठवतो एक छान चापून चोपून घातलेला आंबाडा.
किती तरी वर्ष, किती तरी पिढ्या... तो आंबाडा तसाच आहे...
आणि आजीच वजन ही... आम्ही इकडे डायटिंग करतोय,
जिम करतोय, जॉगिंग करतोय.... पण काही फरक नाही....
आजीला आत्ता बघितल की वाटत.. तरुणपणी किती सुरेख दिसत असेल आजी...

"आजी" ची एक युनिव्हरसल डेफिनेशन आहे...
आई-बाबांकडून ओरडा खाल्यावर किंवा खायच्या आधी जाण्याची सेफेस्ट जागा म्हणजे "आजी"...

पण आजी म्हटले की आठवतो तो.... चपातिवरचा एक्सट्रा तूपाचा चमचा....

"मिले सूर मेरा तुम्हारा" तल्लीन होऊन ऐकणारी आजी...

आजी च्या बांगडी ला नेहमी सेफ्टी पीन असतेच....
आजी कडे रब्बर बॅंड, छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या असा ऐन वेळी
कुठेही ना मिळणारा ऐवज नेहमी सापडणारच...

घरी येणार्‍या प्रत्येक मित्राला डाइरेक्ट "कुठला" ही प्रश्न विचारू शकते ती फक्त आजीच....

आजी म्हटले की आठवते ते कधी ना संपाव असा वाटणारे तेल मालिश...

अप्रतिम बेसनाचे लाडू.... ज्यांची तुलना कशाशीही होऊ शकत नाही....
हळदीच्या पानात केलेले पापलेट चे तुकडे....
नाजूक सुंदर आकाराचे मोदक... ज्यांच्या कडे बघत बसावेसे वाटते....
पावसाची सर आणि आजी ने केलेली कांदा-भजी...
मी नूडल्स खाताना "आपली नात हे काय विचित्र खायला लागली" असा चेहेरा करणारी आजी...

थियेटर मधे गेल्या वर "एस्केलेटर" वर घाबरणारी आजी....

पत्त्यामधे आमच्या चीटिंग मुळे हरणारी आजी....
हळू हळू चीटिंगही करायला शिकणारी आजी....

आजी बद्दल किती लिहु आणि किती नको...
आणि काही गोष्टी लिहीण्या पेक्षा... मनाच्या कोपर्‍यात सांभाळून ठेवलेल्या बर्‍या....
लहान लहान अनुभव.... काही गुपित.... हा प्रत्येकाचा खजिना असतो....
प्रत्येक छोटी आठवण ही आयुष्याच्या घाई-गर्दी मधे येणारी
एक गार वार्याची झुळुक असते...

पण आजी म्हटले की वाटत सगळ काही सोडून द्याव..
आणि आजी च्या मांडीत डोक ठेवून झोपाव....
परत एकदा लहान ह्याव...
परत एकदा आजी सांगत असलेल्या राज कुमारी च्या गोष्टीत हरवून जाव....
आणि कधी झोप लागली ते कळूही नये.....


4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Is this a Letter? I think it is...

    ReplyDelete
  3. so sweet..........!!!!

    ReplyDelete