Wednesday, June 10, 2009

डेफीनेट्ली मेल....



सीन 1 --> (पुणे)


"च्याआयला! कुणीतरी बाई गाडी चालवत असणार... "

सातारा रोड वर सिग्नल ला आम्ही थांबलो होतो...
रेडियो मिरची वर "एका बाईची" फालतू बडबड चालू होती...
सिग्नल हिरवा झाला तरी पुढची कार हलेना...
म्हणून जिजाजींच्या तोंडून ही स्तुती सुमने उधळली गेली...
जिजाजींनी साइड ने गाडी काढली...

मला वाटला जर का पुढचा "कारवाला" निघाला तर जिजाजींचा किती पोपट होईल.. ही ही ही...
पण जिजाजी बरोबर होते...

एक आंटी टाइप बाई गाडी स्टार्ट करायची धडपड करत होती...

मोकळे केस सांभाळत.. गॉगल सांभाळत... तिची खटपट चालू होती..
जिजू लगेच बोलले... "मी म्हणालो होतो ना! कशाला ह्यांना गाड्या देतात काय माहीत"
हे ऐकून मी काही गप्प बसणारी नव्हते...
मी म्हणाले... "का हो जिजू, माणूस गाडी चालवताना कार बंद नाही पडत का?"

जीजू म्हणाले "माझ्या अब्ज़र्वेशन प्रमाणे तरी पुढची कार विचित्र चालत असेल
तर 10 पैकी 8 वेळा तरी बाई गाडी चालवत असते..
2 वीलर चालवताना सुद्धा पुढचा मागचा विचार न करता टर्न घ्यायचा...
सिग्नल दाखवायचा नाही... अरे मागच्या माणसाला काय स्वप्न पडणार आहे..
की बाईसाहेब वळत आहेत म्हणून??"

मी गप्प बसले... कारण बर्‍याच वेळा मी पण हा अनुभव घेतला आहे.

सीन 2 --> (पुणे... रात्री जेवण झाल्या वर)


बाइक : बॉक्सर
बाइक शिकाणारी : मी
बाइक शिकवणारे : माझे "प्रिय" बाबा

पहिली किक.... नीट बसली नाही...
दुसरी किक.... किक वरुन पाय सटकला.. माझा बॅलेन्स गेला.
तिसरी किक.... गाडी ने जरा स्टार्ट झाल्या सारखा नाटक केल... आणि बंद पडली...

"अग.. नीट किक मार... काय किक् मारतेस.. अंगात काय ताकद आहे की नाही?"
बाबांचा डेंजर आवाज़ आला मागून...

चौथी किक.... yipeee... गाडी मस्त चालू झाली... मी पण कॉन्फिडेंट्ली आक्सेलरेटर देत होते...
बाबांचा परत डेंजर आवाज़ (बा. डे. आ. ) "ह्म्म... आता बंद कर... आणि परत चालू कर..."
मी मनातल्या मनात "अरे.. आता चालू झालीय ना.. बंद काय करायची... शी.."
गुपचुप बंद करून परत दोनदा किक मारुन गाडी चालू केली...

(बा. डे. आ. ) "फर्स्ट गियर टाक... आक्सेलरेटर दे... हळू हळू क्लच सोड..."
आक्सेलरेटर दिला.. पण क्लच ची पकड काही सैल होईना...
(बा. डे. आ. ) "अग क्लच सोड हळू हळू... रेस नको करुस.."
माझ्या कपाळावर त्या रात्री च्या थंडीत घाम....
क्लच सोडला.... अचानक एक गचका बसून गाडी बंद पडली...
मागून माझ्या डोक्यात एक टपली....

(बा. डे. आ. ) "तुला सांगतोय ना.. हळू हळू क्लच सोड... आणि आक्सेलरेटर दे..."
"कर परत चालू..."
3-4 किक्स मारुन पण गाडी चालू होईना...
(बा. डे. आ. ) "गाडी गियर मधे आहे.. दुर्गा.. तुझ लक्ष कुठे आहे.."
माझा रडका आवाज़ "ओ बाबा तुम्ही जा हो.. मला तुम्ही असला की काही सुचत नाही...मी नितीन दादा कडून शिकिन बाइक..."
(बा. डे. आ. ) "नाही आत्ताच शिकली पाहिजेस.. त्यात काही विशेष नाही..."
"चल चल मार किक...."


गाडी स्टार्ट केली...
क्लच दाबला...
फर्स्ट गियर टाकला...
आक्सेलरेटर दिला...
क्लच हळू हळू सोडला...
गाडी 1 फुट पुढे गेली....
गचका खाउन बंद पडली...


मागून एक टपली...

माझ्या डोळ्यातून टप-टप पाणी....



सीन 3 --> (मैसूर)


कंपनी कॅंपस मधे एक मुलगी पल्सर चालवत होती...
येता जाता माणसे तिच्या कडे बघत होती.. काही जण कौतुकाने बघत...
काही मुल "क्या लडकी है यार... " या भावनेने बघत होती...
मस्त पैकी गाडी तिने पार्किंग लॉट मधे नेली..
फुल्ल स्टाइल मधे गाडी पार्क करून निघून गेली..


ती मुलगी म्हणजे मी....


माझ्या एका मित्राची बाइक मी चालवत होते...
काही फ्रेंड्स मला म्हणाले... "मस्त है यार... तुझे बाइक चलानी आती है!!"


आता बाइक चालवण ही काही विशेष गोष्ट नाही...
खर तर.. बर्‍याच मुली हल्ली चालवतात..
पण तरी बाइक चालवणार्‍या मुलींची संख्या तशी कमी आहे...
आणि "बाइक चालवण हे मुलांचा काम आहे" हा एक अलिखित नियम आहे आपल्याकडे.

डेफीनेट्ली मेल....

कंपनी कॅंपस मधे गाडी चालवताना काही वाटत नाही..

मी बिनधास्त चालवते.. पण बाहेर चालवताना अजुन ही भीती वाटते...
ट्रॅफिक मधे थोडी भीती वाटते..
मी गाडी चालवू शकणार नाही याची भीती नसते...

भीती वाटते ती लोक काय म्हणतील याची...
गाडी मधेच बंद पडली तर लोक म्हणतील.. "अरे कशाला ही मुलगी गाडी चालवते.."
गाडीचा तोल गेला तर.. "अरे झेपत नाही तुला.. तर बाइक कशाला चालवतेस?? "
आता वास्तविक मी बाइक छान चालवते... पण तरी कॉन्फिडेन्स नसतो...
आणि माझ्या सारख्याच बर्‍याच जणी मधे ह्याच कॉन्फिडेन्स ची कमी आहे....


गरज आहे ती जरा प्रोत्साहनाची...

गरज आहे ती थोड्या कौतुकाची...

गरज आहे ती थोडा विश्वास दाखवायची...